हिंदु संस्कृतीत बाळाचे नाव ठेवण्याच्या पारंपारिक सोहळ्याला नामकरण संस्कार म्हणतात . हि एक मोठी सामाजिक आणि कायदेशीर गरज आहे त्याच बरोबर आई, वडीलांचे एक महत्वाचे कर्तव्य आहे.नामकरण प्रक्रिया बाळ आणि कुटुंबातील इतर व्यक्तींत एक बंध तयार करते म्हणूनच हा एक अत्यंत शुभ प्रसंग आहे. नामकरण संस्कार साधारण बाळाच्या जन्मानंतर १२व्या दिवशी करतात . हा सोहळा प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळा असू शकतो. या समारंभात आईला विशेष सम्मानित केले जाते. या समारंभात उपस्थित असलेले सर्व नातेवाईक आणि अतिथी बाळाला आशीर्वाद देतात. आणि भविष्यात चांगल्या आयुष्याबरोबरच यशस्वी जीवन जगण्याच्या शुभकामना देतात. हा विधी घरात किंवा मंदिरात आयोजित करतात जिथे बाळाला आशीर्वाद, संरक्षण, यशस्वी जीवनासाठी प्रार्थना केली जाते.जर बाळाची जन्म पत्रिका लिहिलेली असेन तर ती देखील आशीर्वादासाठी देवतेच्या प्रतिमे समोर ठेवली जाते. नंतर बाळाला वडिलांच्या (काही क्षेत्रांमध्ये, मामाच्या) कुशीत ठेवून एक विड्याचे पान किंवा चांदीचा ठसा, किंवा काही पाने वापरून बाळाच्या उजव्या कानात हिंदू नाव सांगितले जाते. हे केल्यानंतर बाळाला आशीर्वाद देऊन मध आणि साखर चाटवतात. जर नामकरण समारंभ १२ दिवसांत केला नाही, तर तो १०१ दिवसात किंवा प्रथम वाढदिवसाच्या वेळी केला जाऊ शकतो.